विशेष प्रतिनिधी/मुंबई
बारामतीत शनिवारी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने शह-काटशहाचे राजकारण चांगलेच रंगले. या मेळाव्याचे स्थानिक खासदार, आमदारांना निमंत्रण दिले गेले, पण शरद पवार यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ‘गोविंदबाग’ या आपल्या निवासस्थानी प्रीतिभोजनाचे निमंत्रण देऊन गुगली टाकला होता. पण, या गुगलीला दाद न देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत विविध कार्यक्रमांमध्ये शनिवारी व्यग्र राहणार असल्याने भोजनाच्या आपल्या आग्रही आमंत्रणाला मान देणे यावेळी शक्य होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांना पत्राद्वारे कळविले आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महामेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ‘शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हा कार्यक्रम होत असल्याने पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे आमचे कर्तव्य आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीत येत असल्याने त्यांचे स्वागत करणे ही बारामतीची परंपरा आहे’. असे सांगत शरद पवार यांनी गोविंदबागेत येऊन भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे निमंत्रण दिले होते. एवढेच नव्हे तर निमंत्रणाचे पत्रदेखील पाठविले होते. त्यावर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना पत्र पाठवून भोजनाचे निमंत्रण नाकारले आणि निमंत्रण दिल्याबद्दल आभारही मानले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे इच्छा असूनही मी आपल्याकडे यावेळी येऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते’ तर फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यग्रतेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही’.
दरम्यान, नमो महारोजगार मेळाव्याचे निमंत्रण जिल्ह्यातील खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांना देण्यात आले. परंतु विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार असताना शरद पवार यांना निमंत्रण दिले गेले नाही. विशेष म्हणजे शरद पवार यांनी या कार्यक्रमासाठी बारामतीत वेळ राखून ठेवला होता. परंतु, निमंत्रण न मिळाल्याने विरोधकांनी विशेषत: शरद पवार गटाने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. त्यात गोविंदबागेत भोजनाचे निमंत्रण देऊन गुगली टाकत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना पेचात टाकले. या पार्श्वभूमीवर नंतर सत्ताधाऱ्यांनी सारवासारव केली. त्यांनी शरद पवार यांची निमंत्रण पत्रिका काढली असून, त्यात पवार यांचे नाव नमूद करण्यात आले असल्याचा खुलासा शुक्रवारी करण्यात आला. त्यामुळे शरद पवार महारोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आमंत्रण स्वीकारणार?
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोविंदबागेत भोजनाचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे नाकारले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार भोजनाचे निमंत्रण स्वीकारणार का? याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.