"यानंतर निवडणूक लढवणार नाही", शरद पवारांची मोठी घोषणा

माझ्या वयावर सातत्याने बोलले जाते. मी 1967 पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे", असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
"यानंतर निवडणूक लढवणार नाही", शरद पवारांची मोठी घोषणा

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली गेली नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वयावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी "काहीजण 84 वर्षाचे झाले तरी थांबत नाहीत", असे म्हणत शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. "सध्याची खासदारकीची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे", अशी माहिती शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

"अडीच वर्षांनंतर माझी खासदारकी संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवले आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवलंय तिथे मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्याने बोलले जाते. मी 1967 पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे", असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

संशयाला जागा निर्माण होते-

साधी गोष्ट आहे, ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांनी ती मांडणे यात काहीही चुक नाही. पण, ज्याच्याकडे केस मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच जर ज्यांची केस आहे, त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला जागा निर्माण होते. जर हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा चांगली राहिली असती, असे म्हणत पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर भाष्य केले.

महाराष्ट्र सरकारने गांभिर्याने विचार करावा-

काल सर्वोच्च न्यायालयाने काल बिल्किस बानो प्रकरणात निकाल देत भगिनीला न्याय देण्याचे काम केले. गोध्रा हत्याकांड ही या सामूहिक बलात्कार प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. गोध्रात जे घडले त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यापैकीच ही एक घटना होती. या घटनेला अनेक वर्षे उलटली, त्या भगिनीला न्याय मिळण्यास खूप वेळ लागला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील गुन्हेगारांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महिला वर्गाला आणि सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले आहे. या गुन्हेगारांबाबत निर्णय घेताना महाराष्ट्र सरकारने अत्यंत गांभीर्याने विचार करावा, असे पवार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in