"...तोपर्यंत इथून जाणार नाही"; रोहित पवारांची ईडी चौकशी: सुप्रिया सुळेंनी घेतली भूमिका, शरद पवारही...

आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही", असे सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
"...तोपर्यंत इथून जाणार नाही"; रोहित पवारांची ईडी चौकशी: सुप्रिया सुळेंनी घेतली भूमिका, शरद पवारही...

कथित बारामती अ‍ॅग्रो घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आज ईडी चौकशीसाठी दाखल झाले. मागील पाच ते सहा तासांपासून रोहित यांची चौकशी सुरु आहे. त्यांची चौकशी सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या शेजारी असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून आहेत. जोपर्यंत रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आपण इथून जाणार नसल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. तर, चौकशी संपेपर्यंत शरद पवारही दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.

आमचा ईडीवर विश्वास-

"चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, ते रोहितची बाजू ऐकतील. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही", असे सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

यंत्रणांचा गैरवापर सुरु-

विजय हा सत्याचाच होईल. हा संघर्षाचा काळ आहे. आव्हाने येत आहेत पण, आव्हानांवर मात करू, सत्याच्याच मार्गाने चालू. दुर्दैवाने अनेक यंत्रणांचा गैरवापर केला जातो. रोहित पवारांना नोटीस येणे ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. शेतकरी, कष्टकरी, शोषित, विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई होत असून हे सूडाचे राजाकरण सुरु आहे'', असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

दरम्यान, रोहित पवारांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर होण्यापूर्वी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवारांकडून रोहित पवारांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्याकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी 'बोंबा मारो' आंदोलन केले. सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला आल्या होत्या. ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in