"जो गुलाल उधळलाय, त्याचा..." विराट सभेत जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती; म्हणाले - "...तर पुन्हा आझाद मैदानात येणार"

हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेश टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. अध्यादेशाला धोका झाला तर...
"जो गुलाल उधळलाय, त्याचा..." विराट सभेत जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती; म्हणाले - "...तर पुन्हा आझाद मैदानात येणार"

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप सभा पार पडली. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानले. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे असे सांगून अध्यादेश टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असेही जरांगे यांनी विराट सभेत जाहीर केले. या सभेत जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका -

सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशात जरांगेंची कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची महत्त्वाची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. याबाबत बोलताना, "जो सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सगेसोयऱ्यांना त्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल, याबाबत जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका, शिंदे साहेबांकडे ही विनंती, असे जरांगे यावेळी म्हणाले. तसेच, अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो म्हणून समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर सोडवायला मी पुढे असणार", असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

आम्ही मराठा-ओबीसी गुण्यागोविंदाने राहतो-

पुढे बोलताना, "आरक्षणाला मारलेले खुट्टे उपटून फेकणार म्हणजे फेकणार बोललेलो. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही गावखेड्यात मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होऊ दिला नाही. छोटा-मोठा भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो. पण, नेते आमच्यात भांडण लावतात. आम्ही ओबीसी आणि मराठा यांच्यात तेढ निर्माण होऊ देणार नाही, पण ते आमच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र असे होणार नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये खूप प्रेम आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत, असेही ते म्हणाले.

अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची-

अध्यादेश टिकवून ठेवण्याची, लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा गुलाल अध्यादेशचा आहे, त्याचा सन्मान राहू दे. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे", असे जरांगे म्हणाले. शिंदे समितीला वर्षभर काम करु द्या. गोरगरीब मराठ्यांचं चांगलं होईल. मराठवाड्याचं 1884 गॅजेट आहे, ते शिंदे समितीकडे द्यावं. ते लागू करावं. आमचा फायदा होईल. कारण मराठवाड्यात खूप कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असेही जरांगे म्हणाले. 

यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते. सभेपूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यासोबतच आझाद मैदानाकडे न जाता नवी मुंबई येथूनच आंतरवाली सराटीकडे परतण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिले.

logo
marathi.freepressjournal.in