दंगलखोरांच्या मालमत्ता जप्त करणार - फडणवीस; नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

दंगलीत मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांकडून संबंधित मालमत्तेची किंमत वसूल केली जाईल आणि त्यांनी पैसे दिले नाहीत, तर त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांची विक्री केली जाईल आणि नुकसान भरून काढण्यात येईल, असे फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : नागपूरमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि यापुढे महाराष्ट्रातील दंगलखोरांवर कोणत्या प्रकारची कठोर कारवाई केली जाईल याची योजनाच अधोरेखित केली. दंगलीत मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांकडून संबंधित मालमत्तेची किंमत वसूल केली जाईल आणि त्यांनी पैसे दिले नाहीत, तर त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांची विक्री केली जाईल आणि नुकसान भरून काढण्यात येईल, असे फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.

नागपूरमध्ये फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूर दंगल घटनेप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. कुराणची आयत असलेली चादर जाळल्याचा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर जमावाने संध्याकाळी तोडफोड, जाळपोळ केली, असे ते म्हणाले.

दंगलखोरांची ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. जी व्यक्ती दंगा करताना, दंगेखोरांना मदत करताना दिसत आहे अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. याचसोबत सोशल मीडियाची पडताळणी करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा याला चिथावणी देण्यासाठी पोस्ट केल्या त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकावण्यासाठी मदत केलेली आहे, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

६८ पोस्ट शोधल्या

अशा प्रकारच्या जवळपास ६८ पोस्ट आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत आणि त्या हटवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकावणारे पॉडकास्ट केले, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले अशा सगळ्या ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, काहींच्या गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झालेले आहे. ते सगळे नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत, तर त्यांची संपत्ती विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

...तर सवय होईल

नागपुरात १९९२ नंतर कधीही दंगलीसारखी मोठी घटना घडलेली नव्हती. दंगलखोरांना आता सरळ केले नाही तर मग त्यांना याची सवय होईल. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दंगलीनंतर प्रथमच नागपुरात आलेल्या फडणवीसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

मोदींच्या दौऱ्यावर प्रभाव नाही

नागपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित नागपूर दौऱ्यावर त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

९२ जणांना अटक, १२ अल्पवयीन

या घटनेचे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज, त्याचबरोबर लोकांनीही मोबाइलवर केलेले चित्रीकरण, पत्रकारांनी पोलिसांना दिलेले चित्रीकरण आदींमध्ये जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत १०४ दंगेखोरांची ओळख पटली असून ९२ लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी आणि १२ जण हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कायद्याने जी कारवाई करता येते ती करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गरज भासल्यास बुलडोझर

दंगेखोरांवर उत्तर प्रदेश स्टाईलने कारवाई करण्यात येणार का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, गरज भासल्यास बुलडोझर कारवाई केली जाईल. नागपूरमधील दंगेखोरांवर बुलडोझर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र सरकारची कामकाजाची स्वत:ची स्टाईल आहे, गरज पडेल तेव्हा बुलडोझरचा वापर केला जाईल.

सरकार एका समाजाबाबत पक्षपाती - माणिकराव ठाकरे

राज्यातील महायुतीचे सरकार एका विशिष्ट समाजाबाबत पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला. आपल्या पक्षाच्या सत्यशोधन समितीला पोलिसांनी नागपूरमधील हिंसाचारग्रस्त परिसराला भेट देण्यास मज्जाव केला, असेही ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in