पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे विवेक कोल्हे हे हातात तुतारी घेऊन येत्या विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्यातील मांजरी येथे मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार आणि इतर नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकी दरम्यान विवेक कोल्हे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी एकत्रित जेवण केले. तसेच त्यांची बैठकही झाली. विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शरद पवार त्यांच्या गाडीतून निघाले. त्यावेळी विवेक कोल्हे बाजूला उभे असताना शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सुचना केली त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीत बसून रवाना झाले. त्यामुळे आगामी विधानसभा विवेक कोल्हे राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळाली आहे.
विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपच्या माजी आमदार आहेत. परंतु २०१९ मध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे. तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
नुकत्याच झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमदेवार किशोर दराडे यांच्या विरोधात विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांनी दराडे यांना जोरदार टक्कर दिली मात्र, त्यांचा पराभव झाला. सध्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रावादीच्या फुटीनंतर अजित पवार गटामध्ये गेले आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखवले आहे. आज विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
९ बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत?
लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.