आढळराव पाटील शिवसेनेत जाणार? पुणे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

पुणे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा म्हाडा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
आढळराव पाटील शिवसेनेत जाणार? पुणे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ
संग्रहित छायाचित्र
Published on

रांजणी : पुणे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा म्हाडा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला शिवसेनेतील पुणे जिल्ह्यातील काही प्रभावी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने हा प्रवेश सध्या रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला आणि अभ्यास करण्यासारखा मानला जातो. सुरुवातीला शिवसेनेशी संबंधित असलेल्या आढळराव पाटील यांनी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी जवळीक वाढवली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळात ही मैत्री अधिक दृढ झाली. सन १९९९-२००० मध्ये दिलीप वळसे पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांनी भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासाने आढळराव पाटील यांच्याकडे सोपवली होती.

मात्र, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने आढळराव पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणूक लढवली आणि तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांचा निसटता पराभव केला. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते सलग खासदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यानंतर आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली; मात्र शरद पवार गटाच्या लाटेत डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

समर्थकांकडूनही जोरदार प्रयत्न सुरू

विशेष म्हणजे, आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अरुण गिरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांचे आणखी एक निकटवर्तीय रवींद्र करंजखेले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडे वाटचाल सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशासाठी त्यांच्या समर्थकांकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in