
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि मागण्यांवर चर्चा होणार नाहीत तोवर बंदच राहतील, त्याच बरोबर लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नाही, असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून लिलावत सहभागी न होण्याच निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार असून कोट्यावधींची उलाढाल देखील ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्वावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली होती. परंतु यानंतर देखील तोडगा निघाला नसल्याने व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. सरकार जोपर्यंत निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही. तोपर्यंत बाजार बंदच राहतील कोणताही व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
मागील आंदोलनावेळी दिलेलं आश्वासन सरकारने पाळवलेल नाही. गेल्या तीन महिन्यापासून व्यापारी वर्ग दयनीय अवस्थेत असून मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी चर्चा करावी, अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असा आक्रमक इशारा व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.