संभाजी भिडेंच्या अडचणी वाढणार ? मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

कुमार सप्तर्षी यांनी ही याचिका दाखल केली असून यावर आज(७ ऑगस्ट) सुनावणी पार पडणार आहे.
संभाजी भिडेंच्या अडचणी वाढणार ? मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील महापूरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांमुळे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुमार सप्तर्षी यांनी ही याचिका दाखल केली असून यावर आज(७ ऑगस्ट) सुनावणी पार पडणार आहे.

कुमार सप्तर्षी यांनी या जनहित याचिकेद्वारे समाजमाध्यमं तसंच प्रसारमाध्यामांमधून महापुरुषांबाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याविरोधात काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर महापूरुषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करुन त्यांना प्रसारमाध्यमं किंवा समाजमाध्यामांतून अपमानास्पद टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकाराला देण्याची मागमी या याचिकेतून करण्यात आली आहे.

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. भिडेंच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने राज्यभरता त्यांच्या विरोधात निदर्शने केली होती. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील पडले होते. यानंतर विरोधी पक्षाकडून भिडेंच्या अटकेची मागणी करण्यात आली. तसंच अमरावतीसह राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भिंडेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in