राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार? विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवून मागण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीतील वादाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे. मात्र, शिवसेनेप्रमाणे हाही निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार? विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवून मागण्याची शक्यता
PM

राजा माने/मुंबई

राष्ट्रवादीतील पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या वादावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असून, आज ही सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीतील वादाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे. मात्र, शिवसेनेप्रमाणे हाही निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण विधानसभा अध्यक्ष आतापासूनच तसा विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत. त्यामुळे अंतिम निकालासाठी ते सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निकालासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते.

शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल देण्यास विधानसभा अध्यक्षांकडून सातत्याने दिरंगाई होत होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करून ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देण्याची मुदत दिली होती. मात्र, सुनावणीनंतर निकाल तयार करण्यास वेळ लागणार असल्याचे कारण पुढे करीत वेळ वाढवून मागितला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यामुळे शिवसेनेतील वादाचा निकाल १० जानेवारी रोजी सुनावण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या निकालासाठीही ३१ जानेवारीपर्यंतचीच मुदत दिली आहे. आज दोन्ही गटांची सुनावणी संपली. परंतु आता निकालासाठी १० दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे १० दिवसांत निकाल देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळ वाढवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील वादाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नव्या वेळापत्रकाबाबत दोन्ही गटांशी चर्चा करणार

सुनावणी पूर्ण झाल्याने आता विधानसभा अध्यक्ष नवे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. त्यासाठी ते दोन्ही गटांशी चर्चा करून नवे वेळापत्रक ठरविणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, दोन्ही गटांची परवानगी मिळाल्यास ते नवा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकतात. अंतिम निकालाची नवीन तारीख देण्याची विनंती केल्यास यासंबंधीचा निकाल फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. कारण युक्तिवादासाठी दोन्ही गटांना कमी वेळ मिळाला आहे. भक्कम बाजू मांडण्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी राम मंदिर सोहळा असल्याने कुठलीही सुनावणी होणार नाही. त्यानंतर २३ जानेवारीला सुनावणी होऊ शकते. तसेच २५ जानेवारी रोजी दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाऊ शकते. त्यानंतर २९ आणि ३० जानेवारी रोजी दान्ही गट आपली बाजू मांडतील. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणी संपविली जाऊ शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निकालासाठी आणखी वेळ वाढवून मागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीचाही निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in