मुंबई : ज्या भाजपने तुम्हाला कुत्रा असे संबोधले त्या पक्षाला मत देणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला जिल्ह्यातील ओबीसी समाजाला केल्याने नवा वाद उफाळून आला आहे.
भाजप इतका उद्धट झाला आहे की ते इतर मागासवर्ग समाजाला कुत्रा असे संबोधत आहेत, असे पटोले यांनी सांगितले.
ओबीसी मतदारांना आपण विचारू इच्छितो की, जे तुम्हाला कुत्रा संबोधतात त्यांना तुम्ही मतदान करणार का?
भीती दाखवून भाजप देशाचे ऐक्य भंग करीत आहे. आता महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहत आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पराभूत होण्याच्या मार्गावर आहेत, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
काँग्रेसला नैराश्य; भाजपची टीका
काँग्रेसला नैराश्याने ग्रासलेले असल्याचे पटोले यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर काँग्रेस पक्ष उदासीन झाला आहे, राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे नेते शरद पवार एक विधान करतात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला लाखोली वाहतात आणि आता काँग्रेस भाजपला कुत्रा म्हणते कारण महायुती विजयी होणार असल्याचे जनमत चाचणीमधून समोर आले आहे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.