नाशिक : पुणे आणि मुंबईतील वरळी येथे घडलेल्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणाची मंगळवारी सायंकाळी नाशिकमध्येही पुनरावृत्ती झाली. मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकाने एका ३१ वर्षीय महिलेला बेदरकारपणे गाडी चालवून उडविले, त्यामध्ये ती महिला ठार झाल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्या या वाहनचालकाचे नाव देवचंद रामभाऊ तिडमे असे असून घटना घडल्यावर तो तेथून पसार झाला होता, मात्र त्याला नंतर अटक करण्यात आली. तिडमे हा ध्रुवनगरचा रहिवासी असून तो सातपूर एमआयडीसी परिसरात काम करतो, असे गंगापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दुर्घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव अर्चना किशोर शिंदे असून त्या सायंकाळी ६ वाजता कामावरून घरी जात असताना वेगात आलेल्या गाडीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये शिंदे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
समोरील बाजून येणाऱ्या दोन युवकांनी त्यापूर्वी गाडी वेगाने महिलेच्या दिशेने येताना पाहिले आणि त्यांनी चालकाला सावधानतेचा इशाराही दिला, मात्र चालकाने वेग कमी केला नाही आणि शिंदे यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालक तेथून पसार झाला.
या परिसरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य टिपले गेले होते. तर काही जणांनी गाडीचा क्रमांकही नोंदवून घेतला होता. पोलिसांनी त्यानंतर चालकाच्या घरी जाऊन त्याला अटक केली. दुर्घटनेच्या वेळी त्याने मद्यप्राशन केले होते, असे वैद्यकीय अहवालातून समोर आले आणि त्यामुळेच वाहन त्याच्या नियंत्रणाबाहेर गेले होते. गंगापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि २८१ नुसार त्याचप्रमाणे मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.