मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीप्रकरणी अटक

भाजपचे साताऱ्यातील नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीप्रकरणी अटक
Published on

भाजपचे साताऱ्यातील नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना सदर महिलेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.जयकुमार गोरे यांनी तळबीड, ता. कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, त्यानंतर या महिलेचा व तळबीडच्या मोहिते कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण तळबीड ग्रामस्थांनी केला व याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

नेमके प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. २०१६ साली काँग्रेसमध्ये असताना गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते. त्यामुळे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन त्यांची दहा दिवस जेलमध्ये रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.

गोरे यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र, संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आले. त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित महिलेने पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या महिलेवर खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर शुक्रवारी तिला खंडणी प्रकरणात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in