
रोहा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटीमध्येच एका महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. पनवेल-महाड या एसटी बसवर ड्युटी करणाऱ्या चालक-वाहकांनी समयसूचकता दाखवून तात्काळ या महिलेला कोलाड आंबेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर बाळाची प्रकृती नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात महाड एसटी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली ड्युटी करीत असताना एका प्रवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. एसटी बसमध्येच महिलेची प्रसूती झाली. चालक जाधव आणि वाहक पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाडच्या शासकीय रुग्णालयात नेले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचल्याने बसमधील अन्य प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले.
चालक आणि वाहकाने या महत्त्वाच्या प्रसंगी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल रोहा तसेच महाड एसटी आगार प्रशासनाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
सुशीला रवी पवार (रा. रुद्रोली) असे गरोदर महिलेचे नाव आहे. पनवेल महाड एसटी शनिवारी वडखळ येथून कोलाडकडे येण्यासाठी निघाली. ही बस सायंकाळी ६ वा.च्या सुमारास कोलाडजवळ असलेल्या पुई महिसदरा पुलावर असलेल्या खड्ड्यातून मार्ग काढत होती. यावेळी अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले. तिला प्रसूती कळा सुरू झाल्या असल्याचे लक्षात येताच एसटी चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार यांनी प्रसंगावधानाने ही एसटी बस आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.