कोल्हापूर : शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होत आहे.
यावेळी त्या महिला व युवा सक्षमीकरण या विषयावर बोलत होत्या. यावेळी शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
डॉ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. महिलांना बस मध्ये अर्धा तिकिट, उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण, नवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना सवलत, महिला बचतगट यांना विविध योजनांच्या मार्फत मदत उपलब्ध करून त्यांना सक्षमीकरण करणे सातत्याने महिलांना न्याय मिळविण्याचे काम होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कोणत्याही कामाला नकार देत नाहीत. पांढरे रेशनकार्ड धारक महिलांना देखील आनंदाचा शिधा देण्यासाठी सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची आठवण डॉ. गोऱ्हे यांनी करून दिली. त्यामुळे शिंदे हे खरे लोकांसाठी काम करणारे नेते असून, हिंदूहृदयसम्राट यांचे खरे वारसदार असल्याचे देखील डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.