महिलांकडे सन्मानाने बघण्याचा दृष्टिकोन हवा! विधान परिषदेच्या शताब्दी महोत्सवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
@rashtrapatibhvn/X

महिलांकडे सन्मानाने बघण्याचा दृष्टिकोन हवा! विधान परिषदेच्या शताब्दी महोत्सवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ होत आहे. महिला, मुली आज सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिलांकडे सन्मानाने बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
Published on

मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ होत आहे. महिला, मुली आज सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिलांकडे सन्मानाने बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव विधान भवनात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मान्यवर उपस्थित होते.

त्या म्हणाल्या की, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. येत्या २५ वर्षांत स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा केला जाईल. देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र आजही देशातील महिला, मुली असुरक्षित आहेत. महिलांकडे आजही अत्यंत वाईट नजरेने पाहिले जाते. सुसंस्कृत देशात महिलांकडे कुणी चुकीच्या दृष्टीने पाहू नये. त्यांचा आदर करायला हवा. ज्या दिवशी महिलांचा आधार होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याचे सार्थक होईल. त्यामुळे महिलांकडे वाईट दिशेने पाहिले जाणार नाही, असा समाज घडवणे, प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास होईल, तेव्हाच देशाचा विकास होईल. राजमाता जिजाऊ भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, अशा प्रकारचे योगदान महिलांनी, द्यावे. परदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात. त्यामुळे भारताने चांगल्या संस्कृतीचे जतन करायला हवे. महाराष्ट्र हा देशाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रतिनिधित्व करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला, तर भारताचा विकास होईल, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केले.

विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव विधानभवनात मंगळवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. विधिमंडळाचे वर्ष २०१८ ते २०२४ या ६ वर्षांच्या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ या पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in