महिला एसटी कर्मचारी, अधिकारी बालसंगोपन रजेपासून वंचित

ना रजा, ना रजांचा मोबदला, तर कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एसटी महामंडळातील महिला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला
महिला एसटी कर्मचारी, अधिकारी बालसंगोपन रजेपासून वंचित
ANI
Published on

एस. टी. महामंडळातील महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये जाहीर केला होता. यानंतर महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय देखील महामंडळाकडून यापूर्वी घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मागील जवळपास २ वर्षांपासून या बालसंगोपन रजेचा लाभ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांना तसेच पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचाऱ्यांना झाला नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परिणामी सण असो अथवा यात्रा किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांना हजर राहत सेवा बजवावी लागत आहे. यामुळे ना रजा, ना रजांचा मोबदला, तर कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एसटी महामंडळातील महिला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री रावते यांनी घेतला. या रजेचा लाभ महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात या बालसंगोपन रजांचा लाभ भेटला नसल्याचे महिला एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. केवळ रजाच नाही तर त्या रजांच्या मोबदल्यात केलेल्या कामाचे पैसे देखील एसटी महामंडळाकडून देण्यात आले नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाकडून सोयीनुसार रजा देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे स्वतः महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. रजा देण्यास टाळाटाळ करण्यात येत असली तरी त्या हक्कांच्या रजेदिवशी केलेल्या कामाचा मोबदला तरी का दिला जात नाही? असा सवाल एसटी कर्मचारी संघटनांकडून विचारण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे आपले प्रश्न मांडणे गरजेचे आहे. माझ्या माहितीनुसार नियमानुसार बालसंगोपन रजा आणि त्याचा मोबदला देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी, संघटनांनी वेळोवेळी आम्हाला माहिती देणे आवश्यक आहे.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

logo
marathi.freepressjournal.in