अखेर मैदान मारलंच! पैलवान सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

मागच्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला केवळ २३ सेकंदात आस्मान दाखवत त्यानं महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं आहे.
अखेर मैदान मारलंच! पैलवान सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरीची गदा यंदा पैलवान सिकंदर शेख यांने पटकावली आहे. गेल्या वर्षी हुलकावणी दिलेल्या यशाला यंदा सिकंदरने गवसणी घातली आहे. मागच्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला केवळ २३ सेकंदात आस्मान दाखवत त्यानं महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं आहे.

महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर सिकंदरने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, माझ्या वडिलांचं माझ्या चुलत्याचं, महत्वाचं म्हणजे माझं वस्ताद चंद्रकांत काळे आणि आमचे इश्वरदादार हरगुडे, उत्तमदा योगेश बंबाळे, अस्लमदा यांचं हे यश आहे. हे सगळे माझ्यासाठी खूप राबलेत. माझ्यासाठी हे सर्व पाच दिवस झाले उपाशी आहेत. आज पाच दिवस झाले मी इथं खेळतो आहे. गेल्यावर्षी संधी हुकली होती. तेव्हा मी बोलून दाखवल होतं की पुढच्या वर्षी मीच मारणार, अशा शब्दात सिकंदर शेखनं प्रतिक्रिया दिली आहे.

सिकंदर शेख हा मुळचा सोलापूरच्या मोहोळ तेथील आहे. तो कोल्हापुरातील गंगावेस तालमीत त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. वस्ताद चंद्रकांत काळे यांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. गेल्यावर्षीचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या कथित चुकीच्या निर्णयामुळे त्याला संधी गमवावी लागली होती. मात्र यंदा त्यांने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in