मुख्यमंत्र्यांनी विद्रुपीकरणाचे उद्घाटन करू नये! खासबाग कुस्ती मैदानाचे काम अर्धवट; पैलवानांचे आत्मक्लेश आंदोलन

जळीत दुर्घटनेनंतर शासकीय निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी विद्रुपीकरणाचे उद्घाटन करू नये! खासबाग कुस्ती मैदानाचे काम अर्धवट; पैलवानांचे आत्मक्लेश आंदोलन
मुख्यमंत्र्यांनी विद्रुपीकरणाचे उद्घाटन करू नये! खासबाग कुस्ती मैदानाचे काम अर्धवट; पैलवानांचे आत्मक्लेश आंदोलनप्रातिनिधिक प्रतिमा
Published on

कोल्हापूर : जळीत दुर्घटनेनंतर शासकीय निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम मूळ ऐतिहासिक वास्तूंना सुसंगत नसून, खासबाग मैदानाच्या व्यासपीठाचे काम चुकीच्या व निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करीत पैलवान आणि कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आत्मक्लेश आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काम पूर्ण होण्यापूर्वीच या वास्तूंच्या उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मुख्यमंत्री शाहू महाराजांवरील प्रेमापोटी निधी उपलब्ध करून देत असले तरी त्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, याची त्यांनी पाहणी करावी. अर्धवट आणि ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणाऱ्या कामाचे उद्घाटन करून त्यांनी या प्रकारात सहभागी होऊ नये, अशी मागणी आंदोलकांनी केली. कृती समितीच्या म्हणण्यानुसार, खासबाग कुस्ती मैदानाचे इंग्लंडमेड पोलादी गर्डर भंगारात का टाकण्यात आले, जळीत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांचा तपास अद्याप का झाला नाही, तसेच पुनर्बाधणीच्या कामाचा दर्जा आणि आराखडा याबाबत प्रशासनाने पारदर्शकता का ठेवली नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप समितीने केला.

प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी

खासबाग मैदानात सराव करणारे शेकडो पैलवान तसेच नागरी कृती समितीचे सदस्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे तैलचित्र हातात घेऊन मैदानात जमले. 'मुख्यमंत्री साहेब, विद्रूपीकरणाचे उद्घाटन करून पापाचे वाटेकरी होऊ नका', 'राजर्षी शाहूंचा वारसा नष्ट करणाऱ्यांचा धिक्कार असो', 'कुस्ती मैदान व नाट्यगृहाची वाट लावणाऱ्यांचा धिक्कार असो', अशा घोषणा देत आंदोलकांनी अर्धवट काम असलेल्या मैदानाला फेरी मारली. यावेळी आंदोलकांनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेत आणि डोके बडवून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. शाहू महाराजांनी उभ्या केलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याऐवजी त्यांचे विद्रूपीकरण होत असल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावे

आंदोलनादरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या तैलचित्रासमोर आत्मक्लेश व्यक्त करताना आंदोलकांनी, तुमच्या नावाने मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी योग्य पद्धतीने खर्च झाला आहे की नाही, तुमच्या लाडक्या वास्तू पूर्वीप्रमाणे उभ्या राहत आहेत की नाही, याची शासनाने पाहणी करावी. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावे, त्यांचे नियोजित कार्यक्रम पार पाडावेत आणि कोल्हापुरी पाहुणचार स्वीकारावा, मात्र खासबाग कुस्ती मैदान व केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विद्रूपीकरण झालेल्या कामाचे उद्घाटन करू नये.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in