शिंदे गटाचे आमदार, खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा ; अमृता फडणवीसांना ‘एक्स’, तर अंबानींना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही ‘वाय’ सुरक्षा असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे...
शिंदे गटाचे आमदार, खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा ; अमृता फडणवीसांना ‘एक्स’, तर अंबानींना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांच्या तसेच आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे ४१ आमदार आणि १० खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही पदे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेततही वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केलेली असताना, आता सरकारचा हा निर्णय कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यताय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आता ‘वाय प्लस’ ऐवजी ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा असेल. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही ‘वाय’ सुरक्षा असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनाही ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा असेल.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आधीपासूनच असलेली ‘झेड’ दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तर अंबानी कुटुंबाला झेड प्लस आणि अभिनेता सलमान खानला ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणाची चौकशी करणारे न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांची सुरक्षा सरकारने काढली आहे. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्या सुरक्षेत याआधीच कपात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in