यशवंत बँक अपहारप्रकरणी २७ जणांना ED च्या नोटीस; ११२ कोटींच्या चौकशीचा फास आवळला

कराड येथील द यशवंत सहकारी बँकमधील तब्बल ११२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संशयितांभोवती चौकशीचा फास अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कराड व फलटण येथे छापे टाकल्यानंतर आता या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या संशयावरून २७ जणांना इडीने नोटिसा बजावल्या आहेत.
यशवंत बँक अपहारप्रकरणी २७ जणांना ED च्या नोटीस; ११२ कोटींच्या चौकशीचा फास आवळला
यशवंत बँक अपहारप्रकरणी २७ जणांना ED च्या नोटीस; ११२ कोटींच्या चौकशीचा फास आवळला
Published on

कराड : कराड येथील द यशवंत सहकारी बँकमधील तब्बल ११२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संशयितांभोवती चौकशीचा फास अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कराड व फलटण येथे छापे टाकल्यानंतर आता या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या संशयावरून २७ जणांना इडीने नोटिसा बजावल्या आहेत.

या नोटिसांमध्ये राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, त्यांचे कुटुंबीय तसेच बँकेचे संचालक मंडळातील सदस्य यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चरेगावकर हे भाजपचे तत्कालीन प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात होते, तसेच राज्य मंत्रिमंडळातील एका बड्या मंत्र्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी पदे भूषवली असल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला आहे.

या तपासाच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी ईडीने कराड, फलटणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकले होते. या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, दोघांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात आली आहे.

या सर्व बाबींच्या आधारे इडीने २७ जणांना नोटिसा बजावल्या असून, पुढील टप्प्यात कोणावर अटकेची किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई होणार का, याकडे कराड, फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

५० जणांविरोधात गुन्हा दाखल

कराड शहर पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर रोजी द यशवंत सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) व ईडी यांच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in