मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन

भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे ही मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगणाऱ्या मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या.
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन
Published on

पुणे : भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे ही मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगणाऱ्या मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (दि. २४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे प्रा. रूमा बावीकर आणि डॉ. शमा भागवत अशा दोन मुली आहेत. बाणेर येथील स्मशानभूमी येथे दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जन्माने ज्यू, मुस्लिम व्यक्तीशी विवाह आणि व्याकरणतज्ज्ञ असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचे पूर्वाश्र्रमीचे नाव जेऊषा ऊबेन असे होते. ज्येष्ठ साहित्यिक- नाटककार वसंत कानेटकरांच्या पुढाकाराने त्यांची नाशिकमध्ये एका चित्रमंदिरात काम करणाऱ्या अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) या मुस्लिम तऊणाशी भेट झाली आणि १९५० साली त्यांनी शेख यांच्याशी विवाह केला. त्यांनी आपला धर्म बदलला नाही. पण जेऊषा ऊबेन नाव बदलून त्या यास्मिन शेख झाल्या, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी श्री. पु. भागवत आणि साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली.

विविध पुरस्कार व ग्रंथसंपदा

मराठी शब्दलेखनकोष, मराठी लेखन मार्गदर्शिका ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा ‘डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार’ प्रा. डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला. तसेच ‘मसाप जीवन गौरव पुरस्कार’ व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्कारा’ने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. राज्य शासनाच्या वतीने डॉ. अशोक केळकर सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन, साहित्यिक भानू काळे, लेखक दिलीप फलटणकर, मुस्लिम सत्यशोधक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी, उद्योजक अभय फिरोदिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शेख यांचे अंत्यदर्शन घेतले.

३४ वर्षे अध्ययन

शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईच्या शीव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालय येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियरमध्ये आयएएसच्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्राचे दहा वर्षे अध्यापन केले. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in