यवतमधील हिंसाचारप्रकरणी १८ जणांना अटक; ५०० जणांवर गुन्हे दाखल

यवतमधील हिंसाचारप्रकरणी १८ जणांना अटक; ५०० जणांवर गुन्हे दाखल
Photo : X
Published on

दौंड (पुणे) : पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांत झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळप्रकरणी ५०० पेक्षा जास्त जणांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या सर्वांना दौंड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एका तरुणाने सोशल प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर गावात दोन गटात तणाव पसरला. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी हिंसाचार केला आणि वाहने तसेच मालमत्ता जाळल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीमार करावा लागला.

यवत पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की आतापर्यंत हिंसाचाराशी संबंधित पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी चार गुन्हे हिंसाचार, जाळपोळ आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ५०० हून अधिक लोकांविरुद्ध दाखल आहेत. त्यापैकी १०० हून अधिक जणांची ओळख पटली आहे आणि १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर शनिवारी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

logo
marathi.freepressjournal.in