
बारामती : “अरे तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.
बारामतीतील मेडद येथे बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाली नसल्याचे म्हटले. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही त्याचीच री ओढली. त्यामुळे अजितदादा काहीसे संतापले आणि म्हणाले, तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक झालात का?
दरम्यान, महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेश दौऱ्यावर गेले होते. आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले.
मतदारांच्या अतिआग्रहामुळे कदाचित अजित पवार संतापले असावेत - शिरसाट
“काही वेळेला लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार काही तारतम्य न ठेवता थेट हे काम झालंच पाहिजे, असा अतिआग्रह करतात. त्यावेळेला एखाद्यावर रागावणे हे साहजिक आहे. एखादा लोकप्रतिनिधी उलट बोलला तर त्याची बातमी होते. पण एखादा नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही. कदाचित अजित पवार यांनी रागाच्या भरात ते वक्तव्य केले असावे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.