
रामभाऊ जगताप/कराड
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या साताऱ्यातील फलटण व पुणे येथील निवासस्थानासह गोविंद दूध संघावर आयकर विभागाने छापा टाकला होता. तब्बल १२० तास संजीवराजे यांची आयकरकडून चौकशी चालू होती. रविवारी रात्री उशिरा अखेर ही चौकशी संपली. या ससेमिऱ्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर हे संतप्त झाले असून त्यांनी आता व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून'सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणारच…', असे स्टेटस रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ठेवत त्यातून इशारा दिला आहे. मात्र त्यांनी नेमका कुणाला इशारा
दिला आहे? याची चर्चा सद्या सुरू झाली आहे.
सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण, पुणे येथील निवासस्थानसह गोविंद दूध संघावर आयकर विभागाने गेल्या बुध. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. छापा टाकला. तेव्हापासून याबाबतची चौकशी तब्बल १२० तास म्हणजे रवि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा संपली. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ठेवलेल्या वरील स्टेटसमुळे नव्या राजकीय संघार्षाची सुरुवात झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रामराजेंचे नेमकं स्टेटस काय आहे तर 'सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणारच…', असे स्टेटस रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ठेवले आहे. यात रामराजे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनाच हा इशारा असल्याचे बोलले जाते.
रामराजे पुन्हा अजितदादांसोबत...
रामराजे पुन्हा अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बैठकांना दिसले आहेत. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासोबत रामराजे यांचा कायमच '36 चा आकडा' आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गुडबूक'मध्ये आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येताच रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि गोरे हे वचपा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या कुटुंबामागे चौकशांचा ससेमिरा लागल्याची चर्चा फलटणसह सातारा जिल्ह्यात सुरू आहे.त्यामुळेच रामराजेंनी वरील इशारा 'त्या' दोघांना दिला असल्याचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. आता यावर कोणाकडून काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.