लातूर : लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सरकारकडून आश्वासन मिळूनही अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने संबंधित तरुणाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली, असे बोलले जात आहे.
लातूर येथील आष्टी गावातील रहिवासी असलेल्या आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव रमेश चंद्रकांत फुले (वय, ३६) असे आहे. तो दुसऱ्याच्या शेतात मंजुरी करून आपली उपजीविका करायचा. सत्तेत आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु समाजाला आरक्षण मिळाले नाही. धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे, अशी भावना रमेश नेहमीच व्यक्त करायचा. धनगरांना एसटी आरक्षण मिळाल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील, असे रमेश फुले यांना वाटत होते. मात्र, अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, या नैराश्यातून रमेशने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या घेतली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रमेशचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.