साताऱ्यातील दंगलीत तरुणाचा मृत्यू आक्षेपार्ह पोस्टवरून दगडफेक, जाळपोळ

मुस्‍लीम व्यावसायिकांच्या गाड्यांची मोडतोड करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली.
साताऱ्यातील दंगलीत तरुणाचा मृत्यू आक्षेपार्ह पोस्टवरून दगडफेक, जाळपोळ

कराड : पुसेसावळी, ता. खटाव येथे आक्षेपार्ह पोस्टवरून रविवारी रात्री दोन समाजांत दगडफेक व जाळपोळ झाल्‍यानंतर नूरहसन लियाकत शिकलगार (३२) या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेत दहाहून अधिक जण जखमी झाले असून त्‍यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळपासून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले. मृत युवकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्‍यानंतर मुस्लीम बांधवांनी गर्दी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकरणातील सूत्रधारालाही अटक करावी, अन्‍यथा मोर्चा काढण्याचा इशारा देत मुस्‍लीम बांधवांनी सहा तास ठिय्या मांडला.

पुसेसावळी येथे रविवारी सायंकाळपासून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर जातीय तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. या घटनेनंतर गावात युवक जमू लागले. त्यानंतर मजकूर टाकणाऱ्या युवकाचा निषेध व्यक्त करण्याचे ठरले आणि पोस्ट व्हॉट‌्सॲप स्टेटसच्या माध्यमातून व्हायरल झाली. यामुळे मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आणि मुस्लीम कुटुंबीयांच्या घरासमोरील साहित्याची मोडतोड करण्यास सुरुवात झाली. जमाव एवढ्यावरच न थांबता मुस्‍लीम व्यावसायिकांच्या गाड्यांची मोडतोड करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे संपूर्ण परिसर, पुसेसावळीत हाहाकार उडला.

जाळपोळ करणारा जमाव कमालीचा हिंस्‍त्र बनला. तोडफोड, जाळपोळ केल्‍यानंतर हा जमाव प्रार्थनास्थळाकडे गेला. आरडाओरडा ऐकून आतील काहीजण बाहेर आले. संतप्‍त जमाव प्रार्थनास्थळातून बाहेर आलेल्‍यांवर अक्षरश: तुटून पडला आणि हाणामारीला सुरुवात झाली. यात नूरहसन लियाकत शिकलगार (३२) या तरुणाचा गंभीर दुखापत झाल्‍याने मृत्यू झाला, तर इतर सुमारे दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर साताऱ्यातून अधिक कुमक पाठवण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली जाळपोळ सुमारे दोन तास सुरू होती. पोलीस पोहोचल्‍यानंतर समाजकंटक पसार झाले. रात्रभर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून पुसेसावळीत बंदोबस्‍त ठेवला. पहाटे मृत शिकलगारचा मृतदेह सातारा सिव्‍हील हॉस्‍पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी आणला. यावेळी हजारो मुस्‍लीम बांधव सिव्‍हीलमध्ये एकत्र जमले. सोशल मीडियावरून काही पोस्ट फॉरवर्ड होऊ नयेत, यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजता जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in