यूट्यूब स्टार बिंदास काव्याचा अखेर शोध लागला

आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ टाकल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती
यूट्यूब स्टार बिंदास काव्याचा अखेर शोध लागला

‘यूट्यूब’वर लाखो फॉलोवर्स असलेली औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूब स्टार ‘बिंदास काव्या’चा अखेर शोध लागला आहे. ती मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली. मागील २४ तासांपासून ती बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ टाकल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.

सोशल मीडिया इनफ्लूयन्सर म्हणून ओळखली जाणारी बिंदास काव्या ९ सप्टेंबरला घरातून दुपारी २ च्या सुमारास रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर ती परतली नाही.सायंकाळ होऊनही ती परत न आल्याने तिचे कुटुंब घाबरून गेले होते. काव्याने मोबाइलदेखील बंद केला होता. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. काव्या अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. औरंगाबादच्या पडेगाव भागात आई-वडिलांसह राहणारी काव्या मागील वर्षभरात यूट्यूबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. यूट्यूबवर तिच्या जवळपास सर्व व्हिडीओला ५ ते ४५ मिलियन व्ह्यूजमध्ये प्रतिसाद मिळतो. साडेचार मिलियन सबस्क्राईबर असलेली काव्या वडिलांसोबतच्या व्हिडीओमुळे जास्त प्रसिद्ध झाली. यूट्यूब व्यतिरिक्तही ती अन्य सोशल मीडियावरदेखील प्रसिद्ध आहे. ती निळी जीन्स, पांढरे बूट व तोंडाला स्कार्फ परिधान करून बाहेर पडल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

कोण आहे बिंदास काव्या?

बिंदास काव्याचे खरे नाव काव्यश्री यादव आहे. तिचा जन्म ३० मार्च २००४ रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला. वयाच्या १५व्या वर्षी तिने लोकप्रियता मिळवली. काव्याला तिचे आई-वडील फार सपोर्ट करतात. काव्याचे ‘बिंदास काव्या’ नावाने यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर तिचे ब्लॉग ती अपलोड करत असते. नोव्हेंबर २०१७ मध्ये हे चॅनेल तिने सुरू केले होते. काव्याने कमी वयात यूट्यूबवर यशस्वी भरारी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in