

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा अखेर शांत झाला असून प्रचाराची अधिकृत सांगता झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बहुकोनी लढती रंगल्या असल्या तरी माळशिरस, अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांकडे विशेष लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत २७१ उमेदवार, तर पंचायत समिती निवडणुकीत ४८५ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपने बहुतांश ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी थेट, तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरणात बदल झाला असून काही पक्षांनी मोठ्या जाहीर सभांना मर्यादा घातल्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक नेत्यांसह विविध तालुक्यांमध्ये दौरे करत उमेदवारांच्या प्रचाराला जोर दिला. भाजपने विकासकामांवर भर देत प्रचार केला, तर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
माळशिरसमध्ये तुल्यबळ लढत
माळशिरस तालुक्यात प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर मैदानात आहेत. आमदार जानकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही निवडणूक रिंगणात आहेत. तसेच ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नातेवाईक अर्जुनसिंह मोहिते-पाटील हेही निवडणूक लढवत असल्याने येथे बहुपदरी राजकीय समीकरणे दिसून येत आहेत. प्रचारादरम्यान या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
मोहोळमध्ये बहुकोनी समीकरणे
मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात विविध पक्षांचे उमेदवार उभे ठाकल्याने लढत चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेते तसेच इतर पक्षांचे स्थानिक नेते यांनी प्रचारसभांतून भाजपवर टीका करत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यांतही स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत असून पारंपरिक राजकीय गटांमध्ये मतांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाच्या वेगवेगळ्या गटांतील उमेदवार समोरासमोर आल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे.
जागा व उमेदवारांची आकडेवारी
सर्व १२ जिल्हा परिषदांच्या मिळून ७३१ जागा असून, त्यापैकी ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ८३, अनुसूचित जमातींसाठी २५, तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांसाठी एकूण २ हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. १२५ पंचायत समित्यांमध्ये मिळून १ हजार ४६२ जागा असून, त्यापैकी ७३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी १६६, अनुसूचित जमातींसाठी ३८, तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.