बोगस चेकद्वारे बँकेची १ कोटी ६३ लाखांची फसवणूक हॉटेल व्यावसायिकासह तिघांना अटक

पैशांचा अपहार करून फसवणुक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता
बोगस चेकद्वारे बँकेची १ कोटी ६३ लाखांची फसवणूक हॉटेल व्यावसायिकासह तिघांना अटक

मुंबई : बोगस चेकद्वारे १ कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार करून एका नामांकित बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकासह तिघांना दक्षिण प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तमील अम्मारी सेल्वन, प्रमोद नंदलाल सिंह आणि कृष्ण भगत दलाई अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तमील आणि प्रमोद हे ठाण्यातील तर कृष्णा हा ओरियाचा रहिवासी असून हॉटेल व्यावसायिक आहे. सध्या तो कल्याणच्या खडकपाडा, वसंत पार्कजवळील आनंद ग्रीन अपार्टमेंटमध्ये राहतो. प्रसन्नकुमार झा हे एका खासगी बँकेत मुख्य मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. १४ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँकेचे खातेदार जावेद अस्लम यांच्या दिल्लीतील शाखेच्या एका चेकवर बोगस स्वाक्षरी करून १ कोटी ६३ लाख रुपयांचा परस्पर अपहार केला होता. हा चेक जावेद अस्लम यांनीच दिला असून चेकवर त्यांचीच स्वाक्षरी असल्याचे भासविण्यात आले होते. हा प्रकार निदर्शनास येताच प्रसन्नकुमार झा यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करून फसवणुक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच ठाण्यातील रहिवाशी असलेले प्रमोद सिंह आणि तमील सेलवन या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत कृष्णा दलाई यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला भिवंडी येथून पोलिसांनी अटक केली. तपासात तमीलनेच हा बोगस चेक बँकेत जमा करून ही रक्कम कृष्णा दलाई याच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसंाकडून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यांत त्यांचे इतर काही सहकारी आहेत का, याचा आता पोलीस तपास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in