अपघातग्रस्त तरुणाला १ कोटी नुकसानभरपाई; हायकोर्टाचा निकाल

हायकोर्टाने त्यात वाढ करत ६४ लाख ८६ हजार ७१५ रुपये देण्याचे आदेश दिले.
अपघातग्रस्त तरुणाला १ कोटी नुकसानभरपाई; हायकोर्टाचा निकाल

अपघातात अपंगत्व पत्करलेल्या, या अपघातामुळे फक्त शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या तसेच हालचाल थांबल्यामुळे मुलांचे पालनपोषण करण्यात असमर्थ ठरलेल्या अपघातग्रस्त तरुणाला मुंबई हायकोर्टाने तब्बल १ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

२००४साली झालेल्या अपघातात विविध दुखापतींमुळे अपंगत्व पत्करलेल्या योगेश पांचाळ या तरुणाने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी हे नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत. वाहन अपघात लवादाने नोव्हेंबर २००९मध्ये या तरुणाला ७.५ टक्के व्याजासह ४८ लाख ३८ हजार ५४३ रुपये देण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाने त्यात वाढ करत ६४ लाख ८६ हजार ७१५ रुपये देण्याचे आदेश दिले.

२९ नोव्हेंबर २००४ रोजी बाइकवरून जात असताना पांचाळला डम्परने मुलुंड येथील सोनापूर बसस्थानकाजवळ धडक दिली. धातू कामगार असलेला पांचाळ वर्षाला १.६ लाख रुपये कमवत होता. अपघातानंतर त्याला अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. चेन्नईत जाऊन मणक्याची शस्त्रक्रिया तसेच स्टेम सेल थेरपी यांसह अनेक शस्त्रक्रिया त्याने करवून घेतल्या.

“तक्रारदार याचिकाकर्त्याला वयाच्या २६व्या वर्षीच व्हिलचेअरवर खितपत आयुष्य घालवावे लागणार आहे. शारीरिक आणि मानसिक अपघातासह त्याला शारीरिक हालचाली मंदावल्यामुळे त्याला नातेसंबंध ठेवता येणार नाहीत तसेच भविष्यात मुलांचे पालनपोषण करता येणार नाही. जीवनातील भौतिक सुखांनाही त्याला मुकावे लागणार आहे. इतरांप्रमाणे त्याला जीवनाचा आनंद लुटता येणार नाही,” असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. पक्षाघाताचा झटका बसल्याने त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्याच्या वंधत्वामुळे त्याच्या पत्नीच्या सांसारिक जीवनावरही परिणाम होणार आहे, असेही न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in