मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यात विविध ठिकाणी ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने २४ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भदंत राहुल बोधी होते. आपल्या भूमीला लाभलेला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा दाखवणारा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, बौद्ध विहाराच्या विकासासाठी १ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा लोढा यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भदंत राहुल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
“मी प्रथम मंत्री झालो, तेव्हा या वास्तूमध्ये दर्शनासाठी आलो आणि इथूनच माझ्या कार्याची सुरुवात झाली. राहुल बोधीजी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बौद्ध विहाराच्या विकासासाठी आवश्यक कामांची माहिती समजली. त्या अनुषंगाने २ कोटींपेक्षा जास्त निधी याआधी दिला गेला असून, आता अजून १ कोटी निधी देत आहोत. बौद्ध विहाराच्या विकासासाठी जे काही सहकार्य लागेल ते सर्व देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,” असे लोढा यांनी सांगितले.
डॉ. भदंत राहुल बोधी यांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंत्री लोढा यांचे आभार मानले तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. २ दिवस आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध महोत्सवात भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. २५ फेब्रुवारी रोजी सामाजिक संस्था परिचय, कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान आणि शाहीर जलसा असे कार्यक्रम बघायला मिळाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.