नाल्यातील कचरा अडवण्यासाठी १० फुटांच्या जाळ्या ,वांद्रे येथील नाल्यावर पहिला प्रयोग ; पावसाच्या सहा महिने आधीच पालिकेची तयारी

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नाले खोलपर्यंत साफ करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२३ मध्ये पालिका प्रशासनाला दिले आहेत.
नाल्यातील कचरा अडवण्यासाठी १० फुटांच्या जाळ्या ,वांद्रे येथील नाल्यावर पहिला प्रयोग ; पावसाच्या सहा महिने आधीच पालिकेची तयारी
Published on

मुंबई : कचरा, डेब्रिज, फ्रीज कपाट टाकल्याने दरवर्षी नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येते आणि पालिकेला टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाच्या आगमनाच्या सहा महिने आधीच पालिकेने तयारी केली आहे. वांद्रे पश्चिम येथील पी अँड टी कॉलनी नाल्यात कचरा डेब्रिज जाऊ नये यासाठी नाल्यालगत १० फूट उंच जाळ्या बसवण्यात येत आहे. वांद्रे येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील अन्य लहान मोठ्या नाल्यांवर जाळ्या बसवण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दरवर्षी पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नाले खोलपर्यंत साफ करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२३ मध्ये पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे २०२४ च्या पावसाळ्या आधीच पालिका प्रशासनाने कंबर कसली असून, विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाल्यालगत जाळ्या बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्तालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. यातच मोठ्या प्रमाणात कचरा, डेब्रिज बेजबाबदारपणे नाल्यात टाकण्याचे प्रकार घडतात. नाल्यात मोठ मोठे बेड-सोफे, खाटा, खुर्च्या, गाद्या आदी टाकले जातात. शिवाय सर्वाधिक प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचराही टाकला जातो. त्यामुळे नाल्यालगत जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील नदी, नाले

मुंबईत एकूण नद्या - ५

एकूण छोटे नाले - १५०८ (लांबी ६०५ किमी)

एकूण मोठे नाले - ३०९ ( लांबी २९० किमी)

रस्त्याखालील ड्रेन - ३१३४ किमी

logo
marathi.freepressjournal.in