धावत्या बसमधून पडलेल्या महिलेला १० लाखांची नुकसान भरपाई

बसचालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे तोल जाऊन आपण खाली पडल्याचे संध्या यांनी सांगितले
धावत्या बसमधून पडलेल्या महिलेला १० लाखांची नुकसान भरपाई

धावत्या बसमधून खाली पडल्यामुळे पायाचे बोट गमावणाऱ्या संध्या गायकवाड यांना मोटार अपघात दावा न्यायाधिकरणकडून (एमएसीटी) १० लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

२३ सप्टेंबर, २०१६ रोजी गोरेगाव रेल्वे स्थानक येथून गोकुळधामला जाण्यासाठी संध्या (त्यावेळचे वय २० वर्षे) बसने प्रवास करत होत्या. उतरण्याचे ठिकाण जवळ आल्यामुळे त्या दरवाज्याजवळच उभ्या होत्या. मात्र यावेळी बसचालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे तोल जाऊन आपण खाली पडल्याचे संध्या यांनी सांगितले होते. कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर त्यांनी उजव्या पायाचे तिसरे बोट गमावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून उजव्या पायाची करंगळीसुद्धा जवळपास सुन्न झाली आहे. त्यामुळे उर्वरित आयुष्यातसुद्धा त्यांना उजव्या पायावर जोर देता येणे कठीण आहे. डॉक्टरांनी संध्या यांना धावण्यास तसेच उडी मारण्यासही मनाई केली आहे. त्यामुळे संध्या यांना एकप्रकारे अपंगत्वच आले आहे. या सर्व प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर अखेर पाच वर्षांनी एमएसीटीने तिला मदत करण्याचे ठरवले असून चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे मान्य केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in