
मुंबई : तीन दिवसांत सुमारे १० लाख रुपये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन एका महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रार अर्जावरून कांदिवली पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कांदिवलीत राहणाऱ्या तक्रारदार महिलेला गेल्या आठवड्यात अनया सहानी या महिलेचा एक मॅसेज आला होता. तिने तिला पार्टटाईम नोकरीची ऑफर देत कंपनीचे टास्कचे पूर्ण केल्यास घरबसल्या आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते.
प्रत्येक टास्कमागे तिला दिडशे रुपये तसेच दिवसाला ३० ते ३५ टास्क पूर्ण केल्यास तिला दिड ते पाच हजार रुपये कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. त्यानंतर तिने ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान विविध टास्कसाठी सुमारे १० लाखांची गुंतवणूक केली होती. नंतर हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने पतीला सांगून संबंधित अज्ञात ठगाविरुद्ध ऑनलाईन तक्रार केली होती.