
मुंबई : शहरात घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचा ऐवज पळवून नेला. या दोन्ही घटना अंधेरी आणि दादर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आंबोली आणि दादर पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार अंधेरीतील विरा देसाई रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत असून, २६ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद होता. याच संधीचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्याने कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चांदीचा गणपती, एक एलसीडी टिव्ही, सॅमसंग कंपनीचा टेपरेकॉर्डर, मोबाईल, लोखंडी तिजोरी, सीसीटिव्ही डिव्हीआर, डोनेशन बॉक्स असा सुमारे पावणेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून या चोरट्याने पलायन केले होते. सोमवारी २१ ऑगस्टला तक्रारदार घरी आले असता, त्यांना घरफोडीचा हा प्रकार झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी आंबोली पोलिसांना ही माहिती दिली. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज पळवून नेला. ३५ वर्षांचे तक्रारदार दादर येथे राहत असून, ते एका खासगी कंपनीत कामाला असून, २२ ऑगस्टला त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी विविध सोन्याचे दागिने असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पळवून नेला.