प्रवाशांच्या सेवेत नवीन १० ओपन डेक बसेस

आज जुन्या ओपन डेक डबलडेकरची शेवटची फेरी
प्रवाशांच्या सेवेत नवीन १० ओपन डेक बसेस

मुंबई : पर्यटक प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या ओपन डेक बसेसची सफर यापुढेही करता येणार आहे. १० नवीन ओपन डेक बसेस खरेदी प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या ओपन डेक डबलडेकर बसची गुरुवारी शेवटची फेरी असणार आहे. त्यामुळे गेली २५ वर्षे सेवा देणारी जुनी बस पर्यटकांच्या सेवेतून इतिहास जमा होणार आहे.

२६ जानेवारी १९९७ ला एमटीडीसीच्या सहकार्याने बेस्ट उपक्रमाने ओपन डेक बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणल्या. ओपन डेक बसेसने प्रवासी व पर्यटकांना मुंबई दर्शनाचा आनंद लुटला. ओपन डेक बसमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. पूर्वी ओपन डेक बसमधून मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ओपन डेक बसेसने पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पाच ओपन डेक बस होत्या. १६ सप्टेंबरला पहिली बस सेवेतून काढण्यात आली. त्यानंतर २५ सप्टेंबरला दुसरी आणि आज, ५ ऑक्टोबर ला शेवटची बस सेवेतून इतिहास जमा होणार आहे.

अप्पर ओपन, तर लोअर डेक वातानुकूलित

शेवटची बस सेवेतून हद्दपार होणार असल्याने आणि ओपन डेक बसला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवीन डबल डेकर 'ओपन डेक'बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही सुरू असून, १० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. अप्पर डेक ओपन असेल आणि लोअर डेक (बसची खालील आसनव्यवस्था)वातानुकूलित असेल.

logo
marathi.freepressjournal.in