मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द

१ जुलैपासून लागू असलेली पाणी कपात ९ ऑगस्टपासून रद्द करण्यात आली आहे
मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झाल्याने बुधवार, ९ ऑगस्टपासून १० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत ११ लाख ७८ हजार ७५१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातून पुढील १० महिने मुंबईकरांची तहान भागेल. जूनमध्ये वरुणराजाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाली. ३० जून रोजी सातही धरणांत ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. जुलैपासून धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू झाली. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सध्या सातही धरणांत ८०.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, मे अखेरपर्यंत मुंबईला पुरेल इतका आहे. त्यामुळे १ जुलैपासून लागू असलेली पाणी कपात ९ ऑगस्टपासून रद्द करण्यात आली आहे.

सात धरणांतील ८ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

मोडक सागर - १,२८,९२५

मध्य वैतरणा - १,८६,०५४

अप्पर वैतरणा - १,४६,५९३

भातसा - ५,३६,७२५

तानसा - १,४४,७११

विहार - २७,६९८

तुळशी - ८,०४६

logo
marathi.freepressjournal.in