मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात ; मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे
मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात ; मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पातळीत वाढ झाली असली तरी मुंबईकरांवरचे पाणीसंकट टळलेले नाही. शनिवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाची दमदार इनिंग सुरू असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही जलधारा बरसल्या असून वरुणराजाची संततधार कायम आहे. त्यामुळे एका आठवड्यात १५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. यावर्षी मान्सून लांबला असताना तलावांनीही तळ गाठल्यामुळे १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. सद्यस्थितीत सात ही धरणात मिळून १५७४१२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे आठवड्यापूर्वी ७ टक्क्यांवर असणारा पाणीसाठा १० टक्क्यांवर गेल्यामुळे आठवड्यात पंधरावड्याला पुरणारे पाणी जमा झाले आहे. सद्यस्थितीत जमा झालेले पाणी पुढील ४० दिवसांना पुरणारे आहे.

सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर - ४३३५५ (३३.६३ टक्के)

तानसा - ४७४३८ (३२.७० टक्के)

मध्य वैतरणा - २८३९५ (१४.६७ टक्के)

भातसा - २६५९९ (३.७१ टक्के)

विहार - ८५३५ (३०.३१ टक्के)

तुळशी - ३०९० (३८.४० टक्के)

तीन वर्षांतील ३० जूनची स्थिती

२०२३ - १५७४१२ (१०.८८ टक्के)

२०२२ - १५२१५३ (१०.५१ टक्के)

२०२१ - २५७८३४ (१७.८१ टक्के)

logo
marathi.freepressjournal.in