उद्यापासून मुंबईत १० टक्के पाणी कपात

मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा.
उद्यापासून मुंबईत १० टक्के पाणी कपात

मुंबई : संपूर्ण मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. २० नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर असे १३ दिवस मुंबईकरांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतही होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा करण्याआधी जल शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. पाण्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्यानंतरच पालिकेकडून मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेची वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीही पालिकेला करावी लागते. यानुसार पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे, भिवंडीकरांनोही पाणी जपून वापरा

मुंबईला ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्याव्यतिरिक्त ठाणे आणि भिवंडीला १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. भातसामधून १०० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी आणि ५० दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले कच्चे पाणी भिवंडी आणि ठाण्याला पुरवले जाते. दुरुस्तीच्या कामामुळे या पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in