मुंबईत १० टक्के पाणीकपात अटळ: आयुक्तांकडे प्रस्ताव सादर; राखीव पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारला पत्र

गेल्या वर्षीही पावसाने धरणक्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात केली होती.
मुंबईत १० टक्के पाणीकपात अटळ: आयुक्तांकडे प्रस्ताव सादर; राखीव पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारला पत्र

गिरीश चित्रे/मुंबई : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरणक्षेत्रातील पाण्याच्या पातळीत प्रचंड घट झाली आहे. २० दिवसांचा पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईवर जलसंकटाची चाहूल अशी बातमी दैनिक ‘नवशक्ति’ने मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने १० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव तातडीने तयार करत प्रशासक म्हणून आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. पुढील आठ दिवसांत आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर मार्च महिन्यापासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० दशलक्ष लिटर व भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा सातही धरणांत ७ लाख १४ हजार ६१३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. त्यात जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती टाळण्यासाठी आतापासून उपाययोजना करण्यात येत असून १० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव पालिका प्रशासकाकडे सादर केला आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर मार्च महिन्यापासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षीही पावसाने धरणक्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात केली होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती. परंतु बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे नियोजित वेळेत पावसाचे आगमन झाले नाही, तर पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून १० टक्के पाणीकपात व राखीव पाणीसाठा मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राखीव पाणीसाठ्यावर मुंबईची मदार

अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने राखीव पाणीसाठा उपलब्ध करून दिल्यास ऑगस्टपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध होईल.

१३ फेब्रुवारी रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - १,८८,४०२

मोडक सागर - ५५,०७७

तानसा - ८३,५२२

मध्य वैतरणा - १६,९६४

भातसा - ३,४९,६७८

विहार - १६,२३५

तुळशी - ४७३४

तीन वर्षांत १३ ऑगस्टची स्थिती

२०२४ - ७,१४,६१३

२०२३ - ७,९३,७०७

२०२२ - ८,२९,१८३

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in