मुंबई : मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी करण्यासाठी तज्ज्ञ समितीचा सल्ला घेण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ समितीने ७ डिसेंबर रोजी मलबार हिल जलाशयाची पाहणी केली होती. आता १८ डिसेंबर रोजी तज्ज्ञ समिती पुन्हा जलाशयाची पाहणी करणार असल्याने जलाशयाचा पाण्याचा कप्पा रिक्त करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहरातील काही भागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण या विभागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे, आवाहन मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ, नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत येत्या गुरुवारी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक-१ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक-१ रिक्त केला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, शहर भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे.
तज्ज्ञ समितीकडून सोमवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. यावेळी जलाशयाचा कप्पा रिक्त करावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या भागात पाणीकपात -
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’, ‘सी’, ‘डी’, ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील सर्व क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येणार आहे.