पूरस्थिती टाळण्यासाठी १०० कोटींचा उतारा; वांद्रे, गोरेगाव, मालाड, बोरीवलीकरांना दिलासा

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जलमय स्थिती निर्माण होते. मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवली जाते.
पूरस्थिती टाळण्यासाठी १०० कोटींचा उतारा;
वांद्रे, गोरेगाव, मालाड, बोरीवलीकरांना दिलासा

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील पूरस्थिती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम, गोरेगाव पूर्व आणि पश्चिम, मालाड पश्चिम तसेच बोरीवली पश्चिमेकडील विविध भागात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून या भागांमधील काही नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांचा विस्तार, आरसीसी बॉक्स, नाल्यांचे बांधकाम अशी विविध कामे केली जाणार आहेत. यासाठी पालिका १०० कोटींहून अधिक खर्च करणार आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जलमय स्थिती निर्माण होते. मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवली जाते. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नाल्यालगत जाळ्या बसवण्यात येत आहेत. वांद्रे येथील पी अँड टी कॉलनीजवळील नाल्यालगत जाळ्या बसवण्यात येत आहेत. वांद्रे येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य नाल्यालगत जाळ्या बसवण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. तसेच नाल्यातील कचऱ्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे विविध भागातील नाल्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. काही परिसरात नाल्यांची रूंदी वाढवणे, खोलीकरण, नाले वळविण्याची कामे पालिकेने हाती घेतली आहेत.

या कामाच्या अंतर्गत वांद्रे एच/पश्चिम प्रभागातील पाली गाव आणि ३३ वा रस्ता येथे तसेच शेर्ली राजन गावातील पूरस्थिती कमी करण्यासाठी आरसीसी बॉक्स नाल्याचे बांधकाम करून सुधारणा करण्यात येणार आहे. गोरेगाव पश्चिम पी/दक्षिण विभागातील बांगूर नगरमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचा विस्तार आणि काही ठिकाणी पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोरीवली पश्चिमेकडील आर/मध्य प्रभागातील पाणलोट क. २०४ मध्ये योगी नगर रस्त्यापासून लिंक रोड येथील चंदावरकर नाल्यापर्यंत पर्जन्य जलवाहिन्यांचे दोन मीटर रूंद बांधकाम करण्यात येणार आहे.

गोरेगाव, मालाडकरांना दिलासा!

मालाड पश्चिम येथील पिरामल नाल्याचे जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते मालाड खाडीदरम्यान रुंदीकरण करण्यात येणार आहे. नाल्याची एकूण लांबी ४.२० किमी असून सुमारे ३.५५ किमी लांबीच्या अंतरात हे काम होणार आहे. या कामामुळे गोरेगाव पूर्व भागातील विटभट्टी, गोगटेवाडी, सेंट थॉमस शाळा आणि गोरेगाव पश्चिमेला पिरामल नगर, महेश नगर परिसरात पाणी तुंबण्यापासून आणि पूरसदृश स्थिती रोखण्यास मदत होणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असा होणार खर्च!

पिरामल नाल्याचे रुंदीकरण, मालाड

६० कोटी ३३ लाख १ हजार

 पाली गाव, वांद्रे

८ कोटी १७ लाख ५ हजार

 शेर्ली राजन गाव, वांद्रे

११ कोटी ५४ लाख २० हजार

 बांगूर नगर, गोरेगाव

९ कोटी १२ लाख १२ हजार

 योगी नगर, लिंक रोड, चंदावरकर नाला, बोरीवली

१३ कोटी ६७ लाख ५५ हजार

logo
marathi.freepressjournal.in