शंभर वर्षे जुना बेलासिस पूल जमीनदोस्त होणार, वाहतुकीसाठी आजपासून बंद; बेस्ट बसेससह अन्य वाहनांच्या मार्गांत बदल

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील १०० वर्षे जुना बेलासिस पूल अखेर जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
शंभर वर्षे जुना बेलासिस पूल जमीनदोस्त होणार, वाहतुकीसाठी आजपासून बंद; बेस्ट बसेससह अन्य वाहनांच्या मार्गांत बदल
प्रातिनिधिक फोटो FPJ

मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील १०० वर्षे जुना बेलासिस पूल अखेर जमीनदोस्त करण्यात येणार आहे. पालिका, पश्चिम रेल्वेने पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा पूल तब्बल १८ महिने बंद राहणार आहे. या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली असून सोमवारपासून बेस्ट बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत.

आयआयटी मुंबईने मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांचे सर्वेक्षण केले असता, बेलासिस पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने हा पूल पाडून नवीन पुनर्बांधणी करण्याची शिफारस आयआयटी मुंबईने केली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक, रस्ते वाहतूक आदी गोष्टींचा विचार करत पुलाच्या कामास परवानगी मिळत नव्हती. अखेर पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका व पश्चिम रेल्वेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल येथील बेलासिस आरओबी (रोड ओव्हर ब्रिज) पूर्वेकडील डॉ. आनंदराव नायर मार्ग ते पश्चिमेला वसंतराव नाईक चौक त्यांना जोडणारा हा पूल आहे. दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांमध्ये बेलासिस पुलाचा समावेश होतो. पुलाची उभारणी १८९३ मध्ये करण्यात आली आहे. १३० वर्षे जुन्या असलेल्या पुलाची लांबी ३८० मीटर आणि रुंदी २२.२० मीटर आहे. वाहतूक पोलिसांनी २२ जून रोजी काढलेल्या सूचनेनुसार, २४ जूनपासून बेलासिस पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून पुलावरील वाहतूक बंद झाल्यावर तत्काळ पूल पाडकाम सुरू करण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी सरकते जिन्याचा पूल !

बेलासिस रेल्वे पूल बंद केल्यानंतर पश्चिमेकडून मुंबई सेंट्रल स्थानकाच्या मुख्य बुकिंग कार्यालयाशी संपर्क तुटणार आहे. स्थानिक पादचारी आणि रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या पश्चिम दिशेला सरकते जिने असलेला पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग मुंबई शहरात पहिल्यांदाच होणार असून हा पूल प्रवाशांसाठी ३१ जुलैपर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

या बस मार्गांत बदल

‘डाऊन’ दिशेत ताडदेवकडून येताना बसमार्ग क्रमांक ६३, ६७, १२४, १३५, १२६, १३२, ३५१, ३५७ या बसेस मुंबई सेंट्रल पूल : जहांगीर बोमन मार्ग (बेलासिस मार्ग) येथून न जाता लोकशाहीर पठ्ठे बापूराव मार्गावरून (डायना ब्रीज) सरळ नवजीवन सोसायटी सिग्नल येथे डावे वळण घेऊन लॅमिंग्टन रोड (दा. भडकमकर मार्ग) व्हाया बसमार्ग क्र. ६६/८२ ने येऊन मुंबई सेंट्रल स्टेशन सिग्नल (डॉ. हमीद चौक) येथे उजवे वळण घेऊन नेहमीच्या मार्गाने जाणार आहेत. तर ‘अप’ दिशेच्या नमूद सर्व बसगाड्या याचप्रमाणे डॉ. हमीद चौक डावे वळण घेऊन नवजीवन सो. उजवे वळण घेऊन डायना पूलमार्गे ताडदेव येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जाणार आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकासाठी बस थांबे डायना पुलावर उपलब्ध केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in