बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसेस अशक्यच मागणी तशी बसेसच्या ताफ्यात वाढ: रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग, अरुंद रस्ते; बसेस ठेवणार कुठे?

बेस्ट बसेस हा सार्वजनिक उपक्रम असून, 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चालते. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे बेस्ट उपक्रमाचे कर्तव्य आहे
बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसेस अशक्यच मागणी तशी बसेसच्या ताफ्यात वाढ: रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग, अरुंद रस्ते; बसेस ठेवणार कुठे?

गिरीश चित्रे / मुंबई : मुंबईत पार्किंगची मोठी समस्या आहे, त्यात रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग, अरुंद रस्ते, त्यामुळे बसेसचा ताफा १० हजार झाला तर बसेस पार्क करायच्या कुठे, कुठल्या रस्त्यावर चालवायच्या हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार बसेसची संख्या वाढवणे अशक्य आहे. बसेसची मागणी वाढेल, त्याप्रमाणे ताफा वाढवण्यात येईल, अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली आहे.

बेस्ट बसेस हा सार्वजनिक उपक्रम असून, 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चालते. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे बेस्ट उपक्रमाचे कर्तव्य आहे. इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार बसेसची संख्या इतकी पाहिजे हे बोलणे सोपे आहे. परंतु मुंबईतील बेकायदा पार्किंग, अरुंद रस्ते, रस्त्यांची दुरवस्था यामुळे बसेस घेतल्या, तरी त्या ठेवायच्या कुठे? असा प्रश्न बेस्ट उपक्रमालाच सतावत आहे. बेस्ट उपक्रमाचे २७ बस डेपो असून, या सगळ्या डेपोतही १० हजार बसेस पार्क करणे शक्य नाही. बसेसची संख्या वाढवणे गरजेचे असून, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसेसचा ताफा क्षमतेनुसार वाढवण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एसी डबलडेकर बसेस दाखल होत असून, डबलडेकर बसेसच्या पार्किंगसाठी तीन बस आगारात दुमजली पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे; मात्र भविष्यात १० हजार बसेसचा ताफा झाला, तर त्या पार्क कुठे करायच्या आणि कुठल्या रस्त्यावर चालवायच्या हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

भविष्यात १० हजार बसेसचा ताफा झाला होता आणि त्यापैकी ९ हजार बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणल्या आणि काही बसेसमध्ये अचानक बिघाड झाला, तर संपूर्ण मुंबईत लांबच्या लांब बसेसची रांग दिसेल आणि वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होईल. बसेस घेणे कठीण गोष्ट नाही, परंतु बसेसचा ताफा वाढल्यानंतर त्या बसेस ठेवणार कुठे हा मोठा प्रश्न आहे. मुंबईत सहा हजार बसेसची संख्या पुरेशी होईल, असे मत बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in