बिलाच्या नावाने ११ लाख ६६ हजारांना गंडा

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता
बिलाच्या नावाने ११ लाख ६६ हजारांना गंडा

मुंबई : मुलुंड येथे एकाच वेळेस एका महिलेसह तीन वयोवृद्धांची अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. इलेक्ट्रिक बिल भरले नसून रात्री उशिरापर्यंत सप्लाय बंद होईल अशी बतावणी करून या सायबर ठगांनी ११ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिन्ही वयोवृद्धांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ८७ वर्षांचे तक्रारदार मुलुंड परिसरात राहतात. २२ जुलैला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने तुमचे इलेक्ट्रिक बिल भरले नसून रात्री घराचा विद्युत पुरवठा बंद होईल, असे सांगितले. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून काही पैसे ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून सुमारे नऊ लाख रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार लक्षात येताच ते नवघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती. यावेळी तिथे इतर दोन वयोवृद्ध तक्रारीसाठी आले होते. त्यांनाही अशाच प्रकारे मॅसेज आणि लिंक पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून २ लाख ६६ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यामुळे या तिघांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा नवघर पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत

logo
marathi.freepressjournal.in