सायन येथील ११० वर्षे जुना उड्डाणपूल पाडणार; पाचव्या-सहाव्या लेनचे काम, पुलाची पुनर्बांधणी

सायन उड्डाण पुलाचे काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मंजुरी मिळाली आहे. या पुलाला बॅरिकेडिंग बसवण्याचे काम आधीच सुरू केले आहे.
सायन येथील ११० वर्षे जुना उड्डाणपूल पाडणार; पाचव्या-सहाव्या लेनचे काम, पुलाची पुनर्बांधणी

मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन स्थानकातील ब्रिटीशकालीन ११० वर्षें जुना रोड ओव्हर पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पुलाची पुनर्बांधणी करण्यासह पाचव्या व सहाव्या लेनचे काम करण्यात येणार आहे. गुरुवार ४ जानेवारी रोजी माहिमची जत्रा संपल्यानंतर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या पूल दोन खांबांवर असून, आणि त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन कनेक्टरमध्ये एकच खांब असून, रेल्वे मार्गात कोणताही खांब नसणार आहे.

सायन उड्डाण पुलाचे काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मंजुरी मिळाली आहे. या पुलाला बॅरिकेडिंग बसवण्याचे काम आधीच सुरू केले आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनीही वाहतूक वळवण्यासाठी सूचना फलक लावण्यास सुरुवात केली आहे. “कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा रस्ता बंद करण्यापूर्वी अशा सूचना वाहनचालकांना दिल्या जातात. यामुळे रस्ता बंद होण्यापूर्वी वाहनधारकांना माहिती मिळते. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांच्यातील सायन रेल्वे पुलावरील हा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. सायन रेल्वे हद्दीतील पुलाचे काम करताना पुलाला जोडणारा जोड मार्ग मुंबई महापालिका करणार आहे. तर रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गावरील पुलाचे काम करणार आहे. नवीन पूल बांधण्याचा अंदाजे खर्च सुमारे ५० कोटी इतका येणार आहे.

मुंबई शहर व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा पूल

सायन उड्डाणपूल हा मुंबई शहर व दोन्ही उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील हा पूल बंद झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते धारावी कुंभारवाडा जंक्शनला जोडणारा असल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच चुनाभट्टी ते वांद्रे कुर्ला संकुलाला जोडणारा बीकेसी कनेक्टर आहे; मात्र या कनेक्टरवरून दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे हा वर्दळीचा शीव उड्डाणपूल बंद झाल्यास या भागात मोठी वाहतूककोंडी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

पुलाची लांबी वाढणार!

सायन रेल्वेवरील पूल सद्यस्थितीत ४० मीटर लांब आहे. तो ५१ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in