जाहिरातबाजीवर पालिकेचा ११८ कोटींचा खर्च

सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत एकूण १,२८५ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पैकी ९९४ कामे पूर्ण झाली आहेत.
जाहिरातबाजीवर पालिकेचा ११८ कोटींचा खर्च
Published on

मुंबई : आपला दवाखाना, मुंबईचे सौदर्यीकरण आणि स्वच्छ मुंबई अभियान असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाची माहिती मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी जाहिरातीवर मुंबई महापालिकेने तब्बल ११८.७८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

मुंबईचे सौदर्यीकरण प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पा अंतर्गत मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटं, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सार्वजनिक भिंती रंगीबेरंगी करणे यावर लक्ष केंद्रित करून त्यांची सुधारणा, सुशोभीकरण यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.

सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत एकूण १,२८५ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पैकी ९९४ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील ३१९ तर उपनगरांमधील ६८५ कामांचा समावेश आहे. ही कामे विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आली असून यावर ७१५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. बेस्ट बसेस आणि बस स्थानकांवर पालिकेच्या वतीने सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, स्वच्छता संदेश हे २७ डिसेंबर २०२२ ते २६ जुन २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रदर्शित करण्यात आले होते. या सर्व जाहिरातींसाठी प्रति महिना १९ कोटी ७९ लाख ६८ हजार रुपये जाहिरात एजन्सी साईनपोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेकडून आकारले आहे.

logo
marathi.freepressjournal.in