जखमी गोविंदांवर उपचारासाठी १२५ बेड्स तैनात

महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज
जखमी गोविंदांवर उपचारासाठी १२५ बेड्स तैनात

मुंबई : गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गोविंदा उंच उंच थर लावत असल्यामुळे त्याचा थरार चाहत्यांना अनुभवायला मिळतो. मात्र थर कोसळल्यामुळे सहभागी गोविंदा जखमी होण्याची शक्यता लक्षात घेता, मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात १२५ हून अधिक बेड्स तैनात करण्यात आले आहेत.

दहिहंडी उत्सव लक्षात घेता, पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार, संभाव्य गरज लक्षात घेऊन रुग्णालयांत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

गोकुळाष्टमीच्या दिवशी मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेत सायन रुग्णालयात १०, परळ येथील केईएम रुग्णालयात ७, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.

३ पाळ्यात वैद्यकीय अधिकारी तैनात!

या व्यवस्थेअंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठी उपचार सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यांची नियुक्ती केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in