पर्यटकांचा ‘हेरिटेज वॉक’! पालिकेच्या हेरिटेज मुख्यालयाला पसंती

शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या ‘हेरिटेज वॉक’ला तीन वर्षांत १३ हजार पर्यटकांनी भेट दिली असून पर्यटकांच्या माध्यमातून ‘एमटीडीसी’ आणि पालिकेला लाखो रुपयांचा महसूलही मिळाला आहे.
पर्यटकांचा ‘हेरिटेज वॉक’! पालिकेच्या हेरिटेज मुख्यालयाला पसंती
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेची इमारत ब्रिटिशकालीन असून १८९३ साली दिमाखात उभी राहिली. त्यामुळे पालिका मुख्यालय असलेल्या या ऐतिहासिक इमारतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्रिटिशकालीन वास्तू असलेल्या पालिका मुख्यालय इमारतीचा इतिहास पर्यटकांना उलगडावा, यासाठी ‘हेरिटेज वॉक थीम’ अंमलात आणली. भव्यदिव्य ऐतिहासिक इमारतीचा डोलारा पर्यटकांना आकर्षित करत असून देशविदेशातील पर्यटक मुख्यालयाला भेट देतात. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या ‘हेरिटेज वॉक’ला तीन वर्षांत १३ हजार पर्यटकांनी भेट दिली असून पर्यटकांच्या माध्यमातून ‘एमटीडीसी’ आणि पालिकेला लाखो रुपयांचा महसूलही मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे मुंबई महापालिकेच्या दोन इमारती असून एक इमारत १८९३ साली उभी राहिली असून ती ब्रिटीशकालीन आहे. पालिकेचे मुख्यालय असलेली ही इमारत मुंबईसह देशाच्या जडणघडणीची साक्षीदार आहे. गॉथिक शैलीत असलेली ही देखणी इमारत केवळ मुंबईकरच नव्हे तर देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक इमारतीचे हेरिटेज सौंदर्य सर्वसामान्यांसह देशी-विदेशी पर्यटकांना पाहता यावे, यासाठी मुख्यालय इमारतीत ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्याची संकल्पना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून समोर आली. पालिका मुख्यालयाचा ‘हेरिटेज वॉक’ हा हिंदुस्थानातील पहिलाच उपक्रम आहे. जानेवारी २०२१ पासून हेरिटेज वॉक ही संकल्पना राबवण्यास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामुळे मुंबई आणि पालिकेचा गौरवशाली वारसा-जडणघडण उलगडली जात आहे. पालिका आणि राज्याच्या पर्यटन विकास महामंडळ आणि ‘खाकी टूर’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती खाकी हेरिटेज फाऊंडेशनचे भरत गोठोस्कर यांनी दिली.

हेरिटेज इमारतीची सफर

मुंबईकर-पर्यटकांना शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पालिका मुख्यालयात गाईडच्या उपस्थितीत हेरिटेज सफर करता येते. हेरिटेज वॉकमध्ये इमारतीमधील महापुरुषांचे पुतळे, समिती सभागृहे, हेरिटेज शैलीतील बांधकामांचे महत्त्व गाईडकडून सांगितले जाते.

यामध्ये शनिवारी सायंकाळी ३ वाजता आणि ४.३० वाजता तर रविवारी सकाळी १० आणि ११.३० वाजता तर सायंकाळी ३ आणि ४.३० वाजता हा वॉक असतो. एका वेळी २० जणांच्या बॅचला सव्वा तास हा वॉक घेता येतो. बुकिंग ‘बुक माय शो’वर करावे लागते.

उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याची मागणी

मुख्यालयाच्या हेरिटेज वॉकला मिळणारा प्रतिसाद पाहून फोर्ट परिसरातील हेरिटेज इमारती हायकोर्ट, युनिव्हर्सिटी, पोलीस मुख्यालय या ठिकाणी हेरिटेज वॉक सुरू करण्याची संकल्पना पुढे आली होती. यामुळे मुंबईच्या हेरिटेज वैभवाला जागतिक पातळीवर पर्यटकांकडून पसंती मिळाली असती शिवाय प्रशासनाला महसूलही मिळाला असता. मात्र याबाबत अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने अनेक वास्तू पर्यटक पाहण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे याबाबत अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in